पुणे : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)सोसायटी आणि नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे मंगळवारी ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार त्यांचा कार्यकाळ हा ३ मार्च २०२३ पर्यंत असणार आहे. एफटीआयआयचे माजी अध्यक्ष बी.पी सिंग यांच्या अध्यक्षपदाचा कालावधी ४ मार्च रोजी संपला होता. त्यांना पुन्हा मुदतवाढ घेण्याची इच्छा नव्हती. मात्र मंत्रालयाने त्यांच्यासह सोसायटीच्या अशासकीय सदस्यांचा कालावधीही सहा महिन्यांनी वाढविला. जोपर्यंत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जात नाही तोवर जुनेच सदस्य कायम ठेवण्यात आले होते. मात्र मंगळवारी मंत्रालयाने एफटीआयआय सोसायटीच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.बॅनडेट क्वीन, मिस्टर इंडिया आणि मासूम या शेखर कपूर यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृती आहेत. 'एलिझाबेथ' या चित्रपटाकरिता ऑस्करसाठी त्यांना नामांकन मिळाले होते. उडान, खानदान या मालिकांसह हिंदी, तामिळ चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. केंद्र सरकारचा ' पद्मश्री' सन्मानदेखील त्यांना मिळाला आहे. एलिझाबेथसाठी त्यांना बाफ्ता उत्कृष्ट ब्रिटिश फिल्मसह राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. 'बॅनडेट क्वीन' चित्रपटावरदेखील राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावर त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर केलेले भाष्य चर्चेत आले होते.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 9:00 PM