नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील सीएम हेल्पलाईनवर एक अनोखी तक्रार समोर आली आहे. श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर विधानसभेतील एका काँग्रेस नेत्याने आता थेट सीएम हेल्पलाईनवर तक्रार केली आहे. काँग्रेस नेते बृजमोहन गर्ग यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते 1972 पासून काँग्रेससाठी काम करत आहेत. मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट दिलेले नाही. याचा व्हिडीओही त्यांनी फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. सीएम हेल्पलाईनवर प्रत्येकाच्या समस्या सोडवल्या जातात असं त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
"मी तक्रार केली आहे, माझी तक्रारही सोडवली जावी. काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊन संधी द्यावी" असं असे गर्ग म्हणाले. जेणेकरून ते परिसरातील जनतेची अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करू शकतील. काँग्रेस नेत्याने सीएम हेल्पलाईनवर केलेली ही अनोखी तक्रार सोशल मीडिया फेसबुकवरही शेअर केली आहे. त्यामुळे जिल्हाभरात याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
काँग्रेस नेते बृजमोहन गर्ग हे श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर विधानसभेत राहतात. येथून काँग्रेसचे दिग्गज नेते, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पाच वेळा आमदार राहिलेले राम निवास रावतही येतात. रावत यांचा गेल्या निवडणुकीत भाजपा उमेदवार सीताराम आदिवासी यांच्याकडून पराभव झाला होता. पण, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कोणत्याही परिस्थितीत कापणे अवघड दिसत आहे. अशा परिस्थितीत सीएम हेल्पलाईनवर तिकिटांची मागणी निश्चितच चर्चेत आली आहे.
काँग्रेस नेते बृजमोहन गर्ग म्हणतात की त्यांनी सीएम हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली कारण प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक समस्येवर उपाय आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्नही सुटणार आहे. यांच्या या तक्रारीनंतर अनेक चर्चा रंगत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. तर दुसरीकडे बृजमोहन गर्ग यांनी या व्हिडिओद्वारे आपली तक्रार सोडवण्याचे आवाहन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.