शिलाँग : मेघालयाची राजधानी शिलाँगमध्ये हिंसाचारानंतर शनिवारी रात्री लावण्यात आलेली संचारबंदी रविवारी सकाळी आठ वाजता हटविण्यात आली. तथापि, लुमदिएंगजरी व सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि कँटोनमेंट बोट हाऊस भागात सध्याही अनिश्चितकालीन संचारबंदी सुरू आहे. खासी हिल्स जिल्ह्याच्या इचामतीमध्ये शुक्रवारी आणि शिलाँगच्या लेवदुह बाजारमध्ये शनिवारी झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर शनिवारी रात्री ९ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती. या दोन मृत्यूनंतर विशेषत: खासी स्टुडंट युनियनच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. भारत-बांगलादेश सीमेजवळ इचामती भागात विद्यार्थी संघटनेचे सदस्य आणि बिगर आदिवासी यांच्यात झालेल्या संघर्षात कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. खासी आणि जयंतिया हिल्सच्या सहा जिल्ह्यांत मोबाइल इंटरनेट आणि मेसेज पाठविण्याच्या सेवेवर निर्बंध आणले आहेत.
शिलाँगमध्ये काही भागात संचारबंदी हटविली, संघर्षात दोन जणांचा झाला होता मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 6:37 AM