शिलांग- दोन समुदायांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या प्रसंगानंतर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी एक उच्चस्तरिय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिलाँगमधील सफाई कामगार वस्तीमधील महिला आणि शिलाँग सार्वजनिक वाहतूक सेवेच्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. या सर्व भांडणाचे पर्यवसान मोठ्या तणावात होऊन दोन समुदाय एकमेकांच्या समोर उभे राहण्यापर्यंत शिलाँगमधील परिस्थिती बिघडली होती.शिलाँग येथिल लेव मानलोंग ही वस्ती दुसरीकडे वसवण्याच्या जुन्या योजनेबाबत कायमचा तोडगा काढण्य़ासाठी सरकराने ही समिती स्थापन केली आहे. उपमुख्यमंत्री प्रिस्टोन त्यांनसोंग या समितीचे प्रमुख असतील. त्यांच्यासह गृहमंत्री जेम्स के. संगमा, नागरविकास मंत्री हॅम्लेट्सन डोहलिंग, आरोग्य आणि कुटुंबनियोजन मंत्री अलेक्झांडर एल. हेक, कृषीमंत्री बान्टेइडोर लिंगडोह, खासी हिल्स अॅटोनॉमस डिस्ट्रीक्ट कौन्सीलचे मुख्य कार्यकारी सदस्य प्यान्शेंगेन एन सायेमही या समितीचे सदस्य असतील.मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले, नगरविकास मंत्रालयाला या विषयाबाबत एक अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सफाई कामगारांची वस्ती, तिचा इतिहास, कायदेशीर बाबी, अनधिकृतरित्या राहाणारे लोक याबाबतची माहिती मागवलेली आहे. लवकरात लवकर माहिती सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिलाँगमध्ये निदर्शने करणाऱ्या लोकांना शांततेचे आवाहन केले असून त्यांचे आंदोलन थांबविण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. या आंदोलनाचा रोजंदारी करमारे कामगार, शेतकरी, टॅक्सीचालक, किरकोळ विक्री करणारे लोक, दुकानदार यांच्या कमाईवर परिणाम होत असल्याचीही जाणिव त्यांनी आंदोलकांना करुन दिली.
शिलाँगमधील हिंसक घटनांनंतर मेघालय सरकार स्थापन करणार समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 3:34 PM