शिमला - हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील काँग्रेसच्या मुख्यालयात शिरण्याचा प्रयत्न करणा-या काँग्रेसच्या आमदार आशा कुमारी यांनी एका महिला पोलीस कर्मचा-यासोबत हाणामारी केली. एवढंच नाही तर या महिला पोलीस कर्मचा-याच्या जोरदार कानशिलातही लगावली. यावर ती महिला पोलीस कर्मचा-यानंदेखील न थांबता आशा कुमारी यांच्या जोरदार श्रीमुखात भडकावली. मिळालेल्या माहितीनुसार, आशा कुमारी यांना पोलिसांकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आढावा बैठकीत सहभागी होण्यासाठी रोखण्यात आले होते, अशी कथित माहिती समोर आली आहे.
यादरम्यान, आशा कुमार आणि महिला पोलीस कर्मचा-यामध्ये झालेल्या हाणामारीचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आशा कुमारी या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस आणि पंजाबमधील काँग्रेसच्या प्रभारी आहेत. हिमाचल प्रदेशातील विरोधी पक्षनेते पदाच्या दावेदार मानल्या जात आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी हिमाचल प्रदेशात दाखल झाले आहेत. राहुल गांधी शिमलातील पक्षाचे मुख्यालय राजीव भवनात पक्षाचे आमदार, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी आणि पार्टीचे जिल्ह्याध्यक्षांसोबत बैठक घेऊन निवडणुकीतील वाईट कामगिरीबाबत विश्लेषण करणार आहेत.