वयाच्या तिसऱ्या वर्षी दिव्याला ग्लूकोमाचं निदान झालं. सातवीत जाईपर्यंत तिची दृष्टी गेली. नंतर शाळेनेही तिला काढून टाकलं आणि पुढे प्रवेश देता येणार नसल्याचं सांगितलं. पण दिव्याने हार मानली नाही. संघर्ष सुरूच ठेवला. तिने अभ्यास सुरू ठेवला आणि आता ती दिव्यांगांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील दिव्या शर्माची गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे. 30 वर्षीय दिव्याला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दिव्याने दिलेल्या माहितीनुसार, ती सातवीत शिकत असताना आजारपणामुळे तिची दृष्टी गेली. तिला शाळेने अभ्यास सुरू ठेवण्यापासून रोखलं. त्यानंतर घरूनच अभ्यास केला. दहावी, बारावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घरूनच घेतलं. या काळात ती यूट्यूब आणि इतर माध्यमातून अभ्यास करत राहिली. दिव्या ही मूळची उना जिल्ह्यातील मेहतपूरची रहिवासी आहे. पण आता तिचं कुटुंब पंजाबमधील नया नांगल येथे राहतं.
या काळात तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला, पण तिने हिंमत हारली नाही. आता ती ऑनलाइन रेडिओ स्टेशन ‘उडान’ घरून चालवते. 115 देशांमध्ये लोक ते ऐकतात. कराटेमध्येही ती ब्लू बेल्ट आहे. कार्यासाठी आणि लोकांना प्रेरणा देण्यासाठी तिला तीन डिसेंबर रोजी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.
जेव्हा तुम्ही विशेष मुलांच्या श्रेणीत येतात तेव्हा समाज तुमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. तो तुम्हाला सांगतो की हे मूल काहीही करू शकत नाही. लोक तिच्याबद्दलही असेच विचार करायचे. पण आता लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी लोकांना असं वाटायचे की मी घरी राहते आणि काही करत नाही, पण आता लोकांना माझ्या कामाची माहिती झाली आहे असं दिव्याने म्हटलं.