शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 05:33 AM2024-06-08T05:33:25+5:302024-06-08T05:33:58+5:30
संसद भवनातील भाजप-रालोआची नेते निवडीची बैठक संपल्यानंतर झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हेही उपस्थित होते.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेले अपयशाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीविषयी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तासभर चर्चा केली.
संसद भवनातील भाजप-रालोआची नेते निवडीची बैठक संपल्यानंतर झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हेही उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणारी मंत्रिपदे, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, लोकसभेवर निवडून आलेले पीयूष गोयल, उदयनराजे भोसले तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या तीन जागांवरील पोटनिवडणुका, मराठा आंदोलनाचा विधानसभा निवडणुकीवर होणारा संभाव्य परिणाम आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
याच मुद्यांवर पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी अमित शहा यांच्यासोबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय मंत्रिमंडळात एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.