Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. शिंदे गटासह भाजपचे नेते, मंत्रीही अयोध्या दौऱ्यावर गेलेत. यावरून आता महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
हे कलयुग आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण, नक्कीच महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू. ‘रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाए पर वचन न जाई…’, हे आमचे ब्रीदवाक्य आहे. जनतेला दिलेले वचन पूर्ण करून दाखवू. तसेच, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ‘वज्रमूठ’ सगळीकडे सुरू आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
गेली अडीच वर्ष राज्यात रावणराज्य
गेल्या अडीच वर्षांत राज्यात रावणराज्य सुरू होते. दाऊदशी संबंध असल्याचे सिद्ध झालेल्या मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकले नाही. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली कारागृहात डांबण्यात आले. तुमच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले, वसुलीची प्रकरणे बाहेर आली, हे तुमचे रामराज्य होते का, गेल्या अडीच वर्षांत राज्यात तुमचे रावणराज्य सुरू होते, या शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. तसेच कुठेतरी जाऊन डायलॉगबाजी केली की, ‘रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाए पर वचन न जाई…’, परंतु बाळासाहेबांचे वचन कोणी तोडले, अशी विचारणा श्रीकांत शिंदे यांनी केली.
दरम्यान, गेल्या ९ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तम प्रकारे राज्याचा गाडा हाकत आहेत. राज्यातील जनतेला रामराज्य कोणते, हे बरोबर माहिती आहे, असे सांगत अयोध्येत येणे म्हणजे पर्वणी आहे. रामलल्लाचे दर्शन घ्यायला आलो. यातून राजकारण करायचे नाही किंवा यातून आम्हाला काही साध्य करायचे नाही, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"