मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये शिंदे-कमलनाथ संघर्ष; अध्यक्ष कोणत्या गटाचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 03:12 AM2019-09-10T03:12:17+5:302019-09-10T03:12:37+5:30
उभयतांची सोनिया गांधींशी चर्चा होणार
नवी दिल्ली : मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पाठीराख्यांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला असून, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या दोन्ही नेत्यांना मंगळवार आणि बुधवारी स्वतंत्रपणे चर्चेला बोलावले आहे.
राज्यात अध्यक्षपदी नियुक्ती करताना आमचे म्हणणे ऐकून घ्या, अशी दोन्ही नेत्यांच्या गटांची मागणी आहे. शिंदे यांच्याशी मंगळवारी, तर बुधवारी कमलनाथ यांच्याशी गांधी चर्चा करतील. शिंदे आणि कमलनाथ यांचा पाठिंबा असलेली व्यक्ती राज्यात अध्यक्षपदी असावी, असे गांधी यांना वाटत असले तरी ते शक्य दिसत नाही. राज्यातील आणखी एक शक्तिशाली नेते दिग्विजयसिंह हे शिंदे यांच्याकडे अध्यक्षपद जाऊ नये या भूमिकेचे असल्यामुळे कमलनाथ यांचे काम त्यामुळे सोपे होत चालले आहे. राज्यात आदिवासी व्यक्तीकडे अध्यक्षपद जावे यासाठी कमलनाथ यांचे प्रयत्न आहेत. तसे झाल्यास शिंदे यांची संधी आपोआपच निकाली निघते, असे सूत्रांनी सांगितले.
काय म्हणतात शिंदे समर्थक?
राज्यात पक्षात काही महिन्यांपासून गट पडले असून, शिंदे यांना पाठिंबा असलेला गट मोठ्या वेगाने समोर येत चालला आहे. शिंदे यांना अध्यक्ष नेमले नाही तर मी पदाचा राजीनामा देईन, असा इशारा आधी दातिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अशोक डांगी यांनी दिला होता.
आता तसाच इशारा मोरेना जिल्हाध्यक्ष राकेश मावाई यांनी दिला आहे. ‘शिंदे यांची लोकप्रियता काही लोकांना मान्य होत नसल्यामुळे राज्यातील काही नेते त्यांना मध्यप्रदेशबाहेर कसे ठेवता येईल याचा कट करीत असल्याचे डांगी म्हणाले.