ज्योतिरादित्य सिंदिया यांनी अखेर आपली मध्यप्रदेशातील ताकद सिद्ध केली असून, पोटनिवडणुकीत २८ पैकी १९ जागा जिंकण्यात भाजपाला यश आले आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेला धक्काही लागणार नाही. सात महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य सिंदिया यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने तत्कालीन कमलनाथ यांचे काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले होते.
२५ बंडखोरांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता तर तीन आमदारांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या २८ जागांवर पोटनिवडणुका घेण्यात आल्या. एक्झिट पोलमध्ये भाजपला पोटनिवडणुकीत १६ ते १८ तर काँग्रेसला १० ते १२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण पोलमध्ये दिलेल्या कलपेक्षाही अधिक जागा मिळवून भाजपने मध्यप्रदेशवर सत्ता कायम ठेवली आहे.
भाजपने सध्या १९ जागांवर तर काँग्रेसने ९ जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीला एका जागेवर बहुजन समाज पार्टीचा उमेदवार पुढे होता परंतु नंतर तो मागे पडला. या निकालातून शिवराजसिंग चौहान यांच्या सरकारचे भवितव्य ठरणार होते. एकूण २२९ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत भाजपचे १०७ आमदार आहेत. सत्ता टिकवण्यासाठी भाजपला यातील २८ पैकी किमान ८ जागा जिंकणे आवश्यक होते. तर काँग्रेसकडे सध्या एकूण ८७ आमदार आहेत.