वाराणसी : वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर शनिवारी सायंकाळी गंगेची भव्य आरती बघून जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे अत्यंत प्रभावित झाले. भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेले अॅबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वाराणसीला भेट दिली. यावेळी ते आरतीसाठी दशाश्वमेध घाटावरही आले होते. मोठ्या आत्मीयतेने त्यांनी काशीवासीयांना अभिवादन केले. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात उभय पंतप्रधानांनी सर्वप्रथम गंगेचे पूजन करून समृद्ध जीवनाची मनोकामना केली. नंतर घाटावरील अजीमुश्शान मंचावर बसून त्यांनी गंगा आरतीची अनुभूती घेतली. शब्दांचा अर्थ कळत नसला तरी त्यातील सुमधूर स्वरांनी अॅबे मंत्रमुग्ध झाले होते. दोघांनीही सेल्फी घेतली आणि ही छायाचित्रे लगेच टष्ट्वीटही केली.काशीच्या दशाश्वमेध घाटावर दररोज होणारी ही गंगा आरती अद्भूत असते. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रथमच येथे आलेले अॅबे यांचे विमानतळावर शहनाई, कथ्थक नृत्य, ढोलताशे आणि बौद्ध भिक्षूंच्या पारंपरिक बौद्ध वाद्ययंत्राने जंगी स्वागत करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. (वृत्तसंस्था)
गंगेची आरती बघून प्रसन्न झाले शिंजो!
By admin | Published: December 13, 2015 2:15 AM