शिरोळ पं. स.चे सभापती पद खुले झाल्याने हायव्होल्टेज लढती
By admin | Published: January 23, 2017 8:13 PM
गणेशवाडी, कोथळी, अकिवाट, अब्दुललाटमध्ये चुरस
गणेशवाडी, कोथळी, अकिवाट, अब्दुललाटमध्ये चुरसशिरोळ : जिल्हा परिषदेनंतर आता शिरोळ तालुका पंचायत समितीचे सभापती पदही सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे़ यामुळे गणेशवाडी, कोथळी, अकिवाट, अब्दुललाट या पंचायत समितीच्या खुल्या मतदारसंघात चुरशीच्या आणि लक्षवेधी लढती होणार आहेत़ अनेक मातब्बर उमेदवार या निवडणूक आखाड्यात उतरतील अशीच अपेक्षा आहे़ २१ फेब्रुवारी २०१७ ला होणार्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीत १६ पैकी १० सदस्यांच्या दांड्या उडाल्या़ आरक्षणातील बदलामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला़ मतदारसंघातील फेरबदलामुळे शिरोळ पंचायत समितीचे १४ मतदारसंघ झाले आहेत. त्यातच पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने गणेशवाडी, कोथळी, अकिवाट, अब्दुललाट या मतदारसंघांतर्गत इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे़ स्वाभिमानीसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी स्वबळाची तयारी केली आहे. सभापतिपदाच्या आरक्षणानंतर अनेक इच्छुकांनी आता गुडघ्याला बाशिंग बांधले आहे़ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे देखील सर्वसाधारण गटासाठी खुले आहे़ त्यातच शिरोळ तालुका पंचायत समितीचे सभापती पदही सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत़ सन २०१२ मध्ये पहिल्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण, तर दुसर्या अडीच वर्षांत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण होते. त्यामुळे आता पंचायत समितीचे सभापतिपदाचे आरक्षण कोणते पडणार, याकडे लक्ष लागून होते. सोयीचे आरक्षण पडल्यामुळे आणि उमेदवारीचे वेध लागले असताना सभापतिपदाच्या खुल्या आरक्षणामुळे दुधात साखर पडली आहे़ आता या इच्छुकांकडून तशी तयारीही सुरू झाली आहे़ गावपातळीवरील राजकारण कसे तापते यावरच अनेक इच्छुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे़ (प्रतिनिधी)