पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरकार स्थापन झाल्याच्या काही दिवसातच राज्य पोलिसांनी माजी कॅबिनेट मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (एआयजी) एस राहुल यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन चार सदस्यीय एसआयटी टीम तयार करण्यात आली आहे.
"शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांचा समावेश असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी एआयजी एस.राहुल यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय एसआयटीची स्थापना करण्याच आली आहे. ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण तपासावर लक्ष ठेवतील. 8 मार्च रोजी मोहाली जिल्हा न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणात मजिठियांची न्यायालयीन कोठडी 22 मार्चपर्यंत वाढवली आहे", असं पंजाब राज्याचे पोलीस प्रमुख वीरेश कुमार भवरा यांनी सांगितलं.
24 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने मजिठिया यांना 8 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बिक्रम सिंग यांनी न्यायालयात शरणागती पत्करली होती आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या ड्रग्ज प्रकरणात नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. राज्यातील ड्रग्ज रॅकेटमध्ये कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून मजिठिया यांच्यावर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 जानेवारी रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मजिठिया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मजिठिया यांना २३ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते.
कोण आहेत बिक्रम सिंह मजिठिया?बिक्रम मजिठिया हे शिरोमणी अकाली दलाचे नेते आहेत आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अमृतसर पूर्व मतदारसंघातून उमेदवार होते. मजिठिया यांचा जन्म 1 मार्च 1975 रोजी दिल्लीत झाला. मजिठिया यांनी त्यांच्या व्यवसायाची माहिती समाजसेवा अशी दिली होती. मजिठिया 2007, 2012 आणि पुन्हा 2017 मध्ये पंजाब विधानसभेवर निवडून आले. ते पाणीपुरवठा आणि स्वच्छता, माहिती आणि जनसंपर्क, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, महसूल, जनसंपर्क, NRI व्यवहार आणि अपारंपरिक ऊर्जा या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. ते युवा अकाली दलाचे अध्यक्ष देखील होते.