बंगळुरू, दि. 21- भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरुंगात असलेल्या एआयएडीएमकेच्या सरचिटणीस शशिकला यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होतो आहे. शशिकला यांचं तुरूंगातील सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर शशिकला यांना तुरूंगात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचं बोललं जातं आहे. शशिकला यांना तुरूंगातील नियम लागू नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.बंगळुरुच्या मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साध्या वेषातील शशिकला तुरूंगाबाहेरून आतमध्ये येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी तुरूंगाच्या प्रवेशद्वारावर अनेक सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र, तरीही शशिकला आरामात तुरूंगाच्या आतमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.
भ्रष्टाचार प्रकरणी दोषी असलेल्या शशिकला बंगळुरुच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. मात्र एखाद्या कैद्याला ज्या सुविधांपासून वंचित ठेवलं जातं, त्या सर्व व्हीआयपी सुविधा शशिकलांना मिळत असल्याचा दावा केला जात आहे. बंगळुरु सेंट्रल जेलच्या वरिष्ठ अधिकारी डी रुपा यांनी एक अहवाल सादर केला होता. या अहवालात व्हीआयपी सुविधा मिळाव्यात, यासाठी शशिकला यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
शशिकलांना तुरुंगामध्ये व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप तुरूंग उपमहानिरीक्षक डी रुपा यांनी पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक आर के दत्ता तसंच कारागृह पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांना पत्र लिहून शशिकलांना मिळत असलेल्या व्हीव्हीआयपी वागणुकीबद्दल खुलासा केला होता. शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. तसंच स्टॅम्प पेप घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी यालादेखील विशेष सुविधा मिळत असल्याचं डी रुपा यांनी पत्रातून सांगितलं होतं.कारागृहात नियमांचं होणारं उल्लंघन तुमच्या निदर्शनास आणून देत आहे. इतकंच नाही या सर्वांसाठी दोन कोटींचा लाच दिल्याचंही बोललं जात आहे. कृपया तुम्ही तात्काळ कारवाई करत, नियम मोडणा-यांना शिक्षा करावी", अशी विनंती रुपा यांनी पत्रातून केली. याशिवाय रुपा यांनी अन्य गंभीर आरोपही केले. 10 जुलै रोजी कारागृहातील 25 जणांची ड्रग टेस्ट करण्यात आली होती. यावेळी 18 जणांनी ड्रग्ज घेतल्याचं निष्पन्न झालं होतं. रुपा यांनी त्या सर्वांची यादीच पत्रात लिहिली. शशिकला यांच्या समर्थकांनी डी रूपा यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याची धमकी दिली होती. यावर रूपा म्हणाल्या, मी माझं काम केलं आहे. कोणताही बदनामीचा खटला दाखल झालेला नाही.