नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात पार पडत आहे. राज्यातही शिवजयंतीनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या कार्यक्रमातही खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. यंदाही मोठ्या जल्लोषात हा सोहळा रंगला असताना अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे शिवजयंती कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटचे जवान आले होते. सकाळपासून हे जवान महाराष्ट्र सदनात बँडच्या माध्यमातून कार्यक्रमात शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचं काम करत होते. मात्र दुपारी जेवणाच्या वेळी हे जवान कॅन्टीनमध्ये गेले असताना सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना जेवणाच्या ताटावरुन बाहेर हाकलल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
याबाबत झी २४ तासने दिलेल्या बातमीत म्हटलंय की, पहाटे ६ वाजल्यापासून हे जवान महाराष्ट्र सदनात उपस्थित होते. गोरखा रेजिमेंटचे जवान कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत, पहिल्यांदाच शिवजयंतीच्या निमित्ताने हे जवान महाराष्ट्र सदनात आले होते. या जवानांना कॅन्टीनमध्ये बोलवण्यात आलं होतं. त्यांना जेवणासाठी ताटं वाढून ठेवलं होतं. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र प्रशासनाचे अधिकारी विजय कायरकर यांनी तुम्हाला इथं जेवता येणार नाही, तुमची व्यवस्था अन्य ठिकाणी केली आहे असं सांगत त्यांना कॅन्टीनमधून बाहेर काढलं यावरुन काहीवेळ तणाव निर्माण झाला.
यावेळी शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजकांमधील काही जणांनी या प्रकाराला रोखण्याचा प्रयत्न केला, जवानांचा सन्मान योग्य पद्धतीने व्हायला हवा मात्र अधिकाऱ्यांकडून त्यांना धमकीची भाषा वापरण्यात आली, हा प्रकार धक्काबुक्कीपर्यंत गेला. त्यामुळे या प्रकारावर कारवाई व्हावी. हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीत अजिबात रुचणारा नाही, शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यासाठी हे गोरखा रेजिमेंटचे जवान पहाटे ६ पासून बँड वाजवण्याचे काम करत होते. मात्र अशाप्रकारच्या वागणुकीमुळे शिवभक्त नाराज झाले आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शिवभक्तांकडून करण्यात येत आहे.