चंदगड /कोगनोळी (जि. कोल्हापूर)/बेळगाव :बेळगाव महानगरपालिकेवर कन्नड रक्षण वेदिक संघटनेने लावलेला लाल-पिवळा ध्वज काढण्यात यावा, या मागणीसाठी महामार्गावरील कोगनोळी येथे तसेच शिनोळी (ता. चंदगड) येथील सीमेवरून कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आक्रमक शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले. यावेळी आंदोलकांशी त्यांची जोरदार झटापट झाली. आंदोलक शिवसैनिकांनी तेथेच ठिय्या मारून कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थितीत बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवणारच, असा निर्धार यावेळी व्यक्त केला.१५ दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिक या संघटनेने बेळगाव महानगरपालिका कार्यालयावर लाल-पिवळा ध्वज लावला आहे. हा ध्वज काढावा, अशी मागणी मराठी भाषकांनी केली होती.
बेळगावमध्ये प्रवेश बंदीकोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकावून कर्नाटक सरकारला इशारा दिल्यामुळे कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार आदींना बेळगाव जिल्हा बंदी करणारा आदेश जारी झाला आहे.महिनाअखेर ‘त्या’ ध्वजाबाबत निर्णयपोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून महामोर्चा स्थगित केल्यानंतर बेळगाव महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटविण्यासंदर्भात म. ए. समितीच्या नेत्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्यास होकार दिला आहे.