नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपसह शिंदे गटाकडूनही त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला जातोय. तर, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनंही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या डिनर पार्टीवरही बहिष्कार टाकला होता. त्यानतंर, आजच्या बैठकीलाही न जाण्याचा निर्णय घेतल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच, सावरकर हे आमचे श्रद्धास्थान असून भाजपने आम्हाला सावरकर शिकवू नयेत, असे म्हणत भाजपवरही पलटवार केला.
भाजप आणि शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. मात्र, ही अदानी गौरव यात्रा, अदानी बचाव यात्रा असल्याचं राऊत यांनी म्हटलं. अदानींवरील प्रश्नावर उत्तर नसल्याने, त्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच सावरकरांना पुढे करुन ही गौरव यात्रा काढण्यात येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. यावेळी, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केलं. फडणवीसांनी लिहून दिलेलं ते वाचून दाखवतात, त्यांना सावरकरांबद्दल काय माहिती आहे? असा प्रश्नही राऊत यांनी विचारला. यावेळी, काँग्रेसच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकर यांचं महात्म्य सांगितलं, असेही ते म्हणाले.
नवी दिल्लीत विरोधकांच्या झालेल्या बैठकीत शऱद पवार यांनी हा मुद्दा काँग्रेस नेत्यांसमोर मांडला आहे. सावरकर आणि RSS यांचा संबंध नाही, ते विज्ञानवादी होते. त्यामुळे त्यांना माफीवीर म्हणून हिणवनं योग्य नाही, असं मत शरद पवार यांनी काँग्रेसच्या बैठकीत मांडलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून शरद पवार यांनी सावरकरांचे महात्म्य आणि त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान बैठकीत सांगतिल्याचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.