मुंबई: शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा 25, तर शिवसेना 23 जागा लढवणार असून विधानसभा निवडणुकीत भाजपा 145, तर शिवसेना 143 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच मोठा भाऊ असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. युतीचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचे तीन दिग्गज नेते लवकरच मातोश्रीवर जाणार आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे तीन बडे युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचं समजतं.विधानसभेसाठी शिवसेना पुणे, नाशिक पट्ट्यातील जागांसाठी आग्रही असल्याचं समजतं. सध्या तरी या भागातील एकही जागा शिवसेनेकडे नाही. विदर्भाबद्दल शिवसेना फारशी उत्सुक नसल्याचं दिसतं आहे. विशेष म्हणजे भाजपाकडे असलेल्या अनेक जागा शिवसेनेला हव्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नेमकी कोणती जागा कोणाला मिळणार, याबद्दल उत्सुकता आहे. विशेष म्हणजे याबद्दलची बोलणी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांनाही सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. संजय राऊत सामनामधून थेट मोदी सरकारला वारंवार लक्ष्य करत असतात. याशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलतानाही ते भाजपाविरोधात तीव्र भूमिका घेतात. त्यामुळेच युतीच्या चर्चेत राऊत यांना सहभागी करुन घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.गेल्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या भाजपा-शिवसेनेला राज्यात चांगलं यश मिळालं. मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांचे संबंध बिघडले. त्यामुळे विधानसभेत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. या निवडणुकीच भाजपा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. यानंतर राष्ट्रवादीनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊ केला. त्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करताना भाजपाला अडचण आली. यानंतर 'महाराष्ट्राच्या भल्यासाठी' सत्तेत सहभागी होत असल्याचं म्हणत शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती.
युतीचं ठरलं? भाजपा 25, शिवसेना 23 जागा लढवणार- सूत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 1:51 PM