अतुल कुलकर्णी, मुंबईराज्यात सत्ता मिळावी म्हणून पाच वर्षे स्वप्न पाहणाऱ्या भाजपा शिवसेनेमध्येच आपापसात अनेक मतदारसंघात जुंपल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेनेने सभा, सोशल मीडियातून भाजपालाच लक्ष्य करणे सुरु केले आहे़ त्यामुळे पुन्हा मागच्याच निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची चिंता वाढली आहे. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने मराठीचा मुद्दा काढला आणि त्यांच्या सभांनी वातावरण तयार केले होते. शिवसेनेनेदेखील मनसेलाच लक्ष्य केले़ ‘‘आपला शत्रू कोण हे ठरवा, मनसेवर काय बोलायचे ते आम्ही बोलतो, तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात बोला’’, असा स्पष्ट फोन भाजपा नेते नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना काही मोजक्या पत्रकारांसमोर केला होता. तरीही तेव्हा टीकेचे लक्ष्य मनसेच राहिली आणि मराठी मतं मोठ्या प्रमाणावर विभागली गेली. ज्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. याचीच आठवण आता भाजपा नेत्यांना होत आहे. युती तोडताना आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले़ पण शिवजयंतीच्या नावाने वर्गण्या गोळा करत कोण फिरतो, अशी बोचरी टीका त्यांनीच केली. त्यावर सेनेने प्रत्युत्तर देत हे भांडण चालू ठेवले आहे. ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ या जाहिरातीची सोशल मीडियातून शिवसेनेने जेवढी खिल्ली उडवली तेवढी तर काँग्रेसनेदेखील उडवलेली नाही. ज्या व्हॉटस्अॅपने मोदींना तरुणांमध्ये लोकप्रिय केले़ त्याच व्हॉटस्अॅपवरदेखील भाजपा सेनेची नळावरच्या भांडणासारखी जुंपली आहे. असाच काहीसा प्रकार काँग्रेस-राष्ट्रवादीत सुरु झाला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मांडीला मांडी लावून यापुढे बसणार नाही, अशी घोषणा अजित पवार यांनी करुन टाकली, तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणार नाही, त्यांना हवी ती खातीदेखील देणार नाही, असे चव्हाणांनी घोषित केले. पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी कोल्हापुरात तळ ठोकून दोन्ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये पडद्याआड दिलजमाई घडवली आहे. त्यामुळे आर.आर. पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम ही मंडळी सेफ झाल्याची चर्चा असली तरी मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसे या दोघांची भांडणे गंभीर वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बॅडमिंटन दुहेरीचा सामना चालू आहे आणि त्यात एका बाजूला शिवसेना-भाजपा आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आपापसात लढत आहे. पंच मात्र सामना कधी सुरु होणार याची वाट पहातोय, असे व्यंगचित्र काही दिवसापूर्वी प्रकाशित झाले होते. या परिस्थितीत अजूनही म्हणावा तेवढा फरक पडलेला नाही.
शिवसेना-भाजपातच जुंपली!
By admin | Published: October 07, 2014 5:21 AM