चेतन ननावरे , मुंबईमहायुतीमधील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने फारकत घेताच दक्षिण मुंबईतले राजकीय चित्र बदलले आहे. कुलाबा आणि मुंबादेवी या दोन मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा उमेदवार आमने सामने भिडणार आहेत.याआधी भाजपच्या ताब्यात असलेल्या कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राज पुरोहित, तर शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबादेवीमधून शिवसेनेचे पांडुरंग सपकाळ रिंगणात उतरणार होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पांडुरंग सपकाळ कुलाबा मतदारसंघातून राज पुरोहित यांच्याविरोधात लढणार आहे. या माहितीवर सपकाळ यांनीही शिक्कामोर्तब केले आहे. गेली पाच वर्षे हा मतदारसंघ बांधला असून आपल्याला याच ठिकाणी उमेदवारी हवी होती. तरी दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर कोणीही समोर आले, तरी कुलाब्यातून आपणच विजयी होणार असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही पुरोहित यांनी सांगितले. याउलट शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबादेवी मतदारसंघातून शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे भाजप प्रवक्ते अतुल शहा यांनी सांगितले युती राहिली नसल्याने शिवसेनेचे याठिकाणाहून कोणी रिंगणात आहे की नाही, मात्र भाजपतर्फे आपणास याठिकाणाहून लढण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण मुंबईत शिवसेना-भाजपा आमनेसामने!
By admin | Published: September 26, 2014 2:14 AM