सूरत: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर मंगळवारी रात्री सुमारे २.१५ मिनिटांच्या सुमारास एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना सूरतमधील हॉटेलमधून विमानतळावर नेण्यात आले. बंडखोर आमदारांना घेऊन जाणाऱ्या तीन बसेस विमानतळावर पोहोचल्यानंतर पत्रकारांशी एकनाथ शिंदे यांना गराडा घातला. यावेळी बोलताना जय महाराष्ट्र, बाळासाहेबांचा ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा सार्थ केला जाईल, फिर मिलेंगे अशी पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे ३५ आमदारांना घेऊन थेट सूरतमध्ये दाखल झाले. दिवसभरातील प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी आणि नाट्यानंतर रात्री २.१५ वाजता या आमदारांना पोलिसांच्या कडक बंदोबस्तात विमानतळावर नेण्यात आले. यावेळी पत्रकारांनी सर्वच आमदारांना गराडा घालत प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्व आमदारांना सुरक्षितपणे विमातळाच्या आत नेले.
बाळासाहेबांचा ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा सार्थ केला जाईल
पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना आमदारांनी बंड केलेले नाही. शिवसेना आमदारांनी कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. बाळासाहेब आणि हिंदुत्वाच्या विचारांपासून शिवसेनेचे आमदार कधीही फारकत घेणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. जय महाराष्ट्र! बाळासाहेबांचा ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा सार्थ केला जाईल. हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आम्ही कधी राजकीय फायद्यासाठी वापर करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
आम्ही सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत
सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी असो बाळासाहेबांची कडवट हिंदुत्वाची भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय. आम्ही सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही आणि शिवसेना सोडणार नाही. मात्र, बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे. त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच शिवसेना आणि भाजप यांची युती व्हायला हवी, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि शिवसेना सोडणार नाही, असे सुहास कांदे यांनी म्हटले आहे.