मुंबई - कोरोनाच्या सावटातही बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, निवडणुकीतील विजयासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येते. याचदरम्यान बिहारमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत येऊन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये बिहार निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने देखील उतरावे, अशी मागणी बिहारमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार, शिवसेना बिहार विधानसभेच्या 50 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणावरुन बिहार सरकारने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीचा घाट घातला होता, असा आरोप शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळेच, बिहार सरकारच्या राजकीय षडयंत्राला निवडणुकीच्या मैदानातून उत्तर देण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शिवसेनेच्या धनुष्य-बाण या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे, दुसरे चिन्ह घेऊन शिवसेना मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. बिहार सरकारने मूळ प्रश्ना बाजूला ठेऊन सुशांतप्रकरणावरुन कसे राजकारण केले, हाच शिवसेनाच्या प्रचाराचा अजेंडा असेल, अशीही माहिती आहे.
बिहार प्रमुख हौसलेंद्र शर्मां यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले होत की, बिहारमधील शिवसैनिक निवडणुक लढवण्यासाठी उत्सुक आहे. बिहारमधील कमीत-कमी 50 जागा लढवण्याचा विचार आहे. त्यामुळे यासंदर्भात बोलण्यासाठी आम्ही संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. बिहारमधील शिवसैनिकांची जी मागणी आहे ती संजय राऊतांना सांगितली आहे. त्यामुळे आता निवडणुक लढवायची की नाही, यासंदर्भात अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतली असं हौसलेंद्र शर्मा यांनी सांगितले.
2015 मध्ये लढवल्या 80 जागा
सन 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 243 जागांपैकी 80 जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडणूक आला नाही. मात्र, शिवसेनेला एकूण 2 लाख 11 हजार 131 मते मिळाली होती. त्यात हयाघाट, बोचहा, दिनारा जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब आणि मोरवा या सात विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. विशेष म्हणजे एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही अधिक मते मिळाली होती. दरम्यान, बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेशर यांना तिकीट मिळाल्यास, शिवसेनेकडून त्यांच्याविरोधातही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.