नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असून, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते. यावरून विरोध पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांचा अन्य नेत्यांवर विश्वास नसेल, तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी रश्मी वहिनींकडे यांना द्यावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. याचाच धागा पकडत आता शिवसेनेच्या एका नेत्याने, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतील, असे म्हटले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळास लवकरच अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदाचे समसमान वाटप म्हणजे अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिल्याने युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यामुळे, भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्नही सातत्याने चर्चिला जात आहे.
रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद दिले तर कोणाचीही हरकत नसेल
रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. त्यांच्याकडे राज्याचे प्रमुखपद दिले तर कोणाचीही हरकत नसेल, असे शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार हे दिल्ली गेले होते, तेथे त्यांनी महत्त्वाच्या मंत्र्यांच्या भेटीही घेतल्या. दुसरीकडे, गडकरी राज्यात आले तर शिवसेना-भाजपचे मने जुळतील का? असा प्रश्न मंत्री अब्दुल सत्तार यांना झी 24 तास वृत्तवाहिनीवर विचारण्यात आला होता. त्यावर, नितीन गडकरी ज्यादिवशी मने जुळविण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशी खरोखर मने जुळतील, असे सत्तार यांनी म्हटले.
अमित शाहांनी पुढाकार घेतल्यास काहीही होऊ शकते
शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यादिवशी निर्णय घेतील आणि नितीन गडकरी व अमित शाह यांनी पुढाकार घेतल्यास काहीही होऊ शकते. मी शिवसेनेचा साधा कार्यकर्ता आहे, पण भविष्यात युतीचा प्रस्ताव गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी पुढील अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव ठेवल्यास निश्चितच विचार विनिमय होऊ शकतो, असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रात भविष्यात कुठलेही परिवर्तन करायची असल्याच, त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विधिमंडळ अधिवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री उपस्थित नसले तर पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असे स्वाभाविक आहे. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नसावेत, असा प्रश्न विचारला असता, त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.