लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. सत्ताधारी भाजपाचे योगी आदित्यनाथ सरकार आणि विरोधकांमध्ये तुंबळ आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेनाही आज प्रचारात उतरली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊत हल्लाबोल केला. शिवसेनेचं उत्तर प्रदेशात काय काम आहे? असं अनेकजण विचारतात. पण, २०२४ पर्यंत पूर्ण उत्तर प्रदेश भगवा होईल तेव्हा त्यांना समजेल शिवसेनेचं काय काम होतं, असं राऊत म्हणाले. तसेच आमच्याकडे खूप हिंदी भाषिक लोक आहेत. महाराष्ट्रात जिथंही जातो तिथे जास्तीत जास्त लोक उत्तर प्रदेशातील लोक आहेत. आमचं उत्तर प्रदेशासोबत नातं आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी प्रचारसभेत सांगितलं.
आमचं राजकारण आधीपासून पारदर्शक आहे. आमच्या हातात हिंदूत्वाचा भगवा आहे. पण आमच्यासोबत हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन सर्वच जाती-धर्माचे लोक आहेत. आम्ही देशहिताचं राजकारण करतोय. कोणाच्या हृदयात कोणाचं रक्त आहे हे १० मार्चला समजेल. तुमच्या रक्तात काय आहे? हे जनता ठरवणार आहे, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. हे मतदान सात टप्प्यांत पार पडणार असून, अखेरच्या टप्प्यातील मतदान ७ मार्च रोजी आहे. उत्तर प्रदेशसह देशातील अन्य पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकत्रितपणे १० मार्च रोजी होणार आहे.
शिवसेनेचे ३९ उमेदवार निवडणूक रिंगणार
भाजपवर सातत्याने टीका करताना कडवी टक्कर देण्यासाठी शिवसेनेने आपले उमेदवार निवडणूक रिंगणार उतरवले आहेत. भाजपला देशात आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण ४०३ जागांसाठीच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती मिळाली आहे. वास्तविक शिवसेनेने ५९ उमेदवारांना तिकीट दिले होते. मात्र, यातील २२ जणांच उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याने आता शिवसेना उमेदवारांची संख्या ३९ वर आल्याचे सांगितले जात आहे.