मुंबईः सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संजय राऊत काल दुपारी 3.30 वाजता बेळगावात पोहोचले. बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित बॅ नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी राऊत यांनी प्रकट मुलाखत दिली. तसेच संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेत बेळगाव प्रश्नासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.मी महाराष्ट्रात जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरेंना सांगेन की, बेळगावची परिस्थिती अन् लोकांच्या भावना काय आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयात 14 वर्षांपासून ते लटकत पडलं आहे. तारखांवर तारखा पडत आहेत. त्यावर राजकीय भाष्य करणं योग्य नाही. असंख्य वर्षांनी राम मंदिराचा प्रश्न न्यायालयातून सुटला. न्यायालयाच्या माध्यमातूनच या प्रकरणाचा निकाल लागायला हवा, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. कर्नाटक सीमाप्रश्न सोडवायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी एकत्र येऊन चर्चा केल्यास हा संघर्ष लवकर सोडविता येईल. महाराष्ट्र सरकारनं आपापल्या परीनं भूमिका पुढे नेली. हरिश साळवे हे जगातील सर्वोच्च वकील आहेत. ब्रिटनच्या महाराणीचेही तेच वकील आहेत. तेच वकील आपलेही आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपले आहेत.
17 जानेवारी 1956 यादिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.