नवी दिल्ली/मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने त्यांची अलिबागमधील संपत्ती जप्त केली आहे. याशिवाय राऊतांचा दादरमधील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर, संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. 'मी तुमच्या बापालाही घाबरत नाही,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत आहेत. संपत्ती म्हणताय ती राहते घर असेल किंवा कुणी कष्टाच्या पैशांतून घेली असेल, तर त्याचा संबंध कुठे तरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा. मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.
माझी संपत्ती काही नाही, जमिनिचा तुकडा आणि राहतं घर याला संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्याच बदलावी लागेल. माझे राहते घर फार तर 2 रूम किचन एका मराठी माणंसाचे घर, एका मध्यमवर्गिय माणसाचे घर आहे. अलिबाग माझे गाव, तेथे साधारणपणे 50 गुंठ्याची जमिन, याला कुणी संपत्ती म्हणत असेल, तर मराठी माणसासाठी तेवढी संपत्ती आहे. एवढेच नाही, तर अशा कारवायांपुढे संजय राऊत शिवसेना झुकणार नाही आणि वाकणारही नाही, असेही राऊत म्हणाले.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या लोकांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मदत करा, नाही तर मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल, अशा धमक्या मला दिल्या होत्या. तेव्हा मी म्हणालो होतो, हे शक्य नाही. तुम्हाला हवे ते करा, असा गौप्यस्फोटही राऊतांनी यावेळी केला. याच वेळी, जेवढे बेकायदेशीर कामे करायचे आहेत करा, आम्ही सगळ्या कारवायांचे स्वाकत करतो. कायद्याला अशा पद्धतीने मारले जाऊ शकत नाही, असेही राऊत म्हणाले.