नवी दिल्ली: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. यातच आता संजय राऊत लवकरच बाहेर येतील. कायद्यावर आमचा विश्वास आहे, असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात कार्यरत होते. त्यावेळी विरोधकांच्या आरोपांचा राऊत सातत्याने समाचार घेत होते. त्यामुळे तपास यंत्रणांच्या माध्यमातून राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार आहे. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. मात्र, राऊत यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे, असे अनिल देसाई यांनी सांगितले.
कायद्याचे राज्य आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे
संजय राऊत वारंवार शिवसेनेची भूमिका मांडतात. स्पष्ट शब्दात ते विरोधकांना नामोहरम करतात. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे कायद्याचे राज्य आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे, असे अनिल देसाई यांनी म्हटले आहे. ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. या आधीही संजय राऊतांची चौकशी झाली. आता एक नवीन कारण शोधून पुढे आणले जातेय. केंद्रीय यंत्रणा ज्या कारवाई करतायत, त्या लोकशाहीला धरून नाही, असा आरोपही अनिल देसाई यांनी केला.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले जेपी नड्डा ही माणसे स्वत:ला शक्तीशाली समजतात. भाजप कसा राष्ट्रीय कार्यक्रम राबवतोय हे दिसून येत आहे. मात्र, या देशात तरी लोकशाही आहे आणि लोक हे सगळे बघतायेत, असे सूचक विधान अनिल देसाई यांनी केले.