नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने सक्तवसुली संचालनालयाने (ED) जारी केलेल्या समन्सनुसार चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नसल्याने ७ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीकडे केली. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांची मागणी फेटाळून लावत २७ जुलै रोजी हजर राहण्याचे नवे समन्स जारी केले. यानंतर आता संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ईडीवर निशाणा साधला आहे.
यापूर्वी ईडीने संजय राऊत यांची १ जुलै रोजी १० तास चौकशी केली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत, राकेशकुमार वाधवान, सारंगकुमार वाधवान यांच्या विरोधातही म्हाडा अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. या घोटाळ्याची आर्थिक व्याप्ती मोठी असल्याने याप्रकरणी ईडीने चौकशीची सूत्रे हाती घेतली. ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले. यातच आता संजय राऊत यांनी ईडीवर टीका केली आहे.
डर के माध्यम से ही...
संजय राऊत यांनी ओशो यांचा एक सुविचार ट्विट केला आहे. संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मनुष्य का हमेशा डर के माध्यम से ही शोषण किया जाता है! जो डर गया वो मर गया. जय महाराष्ट्र! तत्पूर्वी, काही तासांपूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी वेळ वाईट असेल तर लोक तुमचा हात पकडण्यापेक्षा 'चुका' पकडतात, असे म्हटले होते. तर त्याआधी संजय राऊत यांनी, उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.
दरम्यान, गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासामध्ये १०३९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत ईडीने संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, संजय राऊत संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्ली येथे आहेत. त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालयात जाऊन राऊत यांना चौकशीसाठी ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचे पत्र अधिकाऱ्यांना सादर केले. मात्र, ईडीने ही मागणी फेटाळली. त्यामुळे संजय राऊत यांना २७ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.