नवी दिल्ली: आपण सोशल मीडियापासून दूर जाण्याच्या विचारात असल्याचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच भूकंप झाला. याबद्दल रविवारी बोलू असं मोदींनी म्हटलंय. त्यामुळे मोदी रविवारी नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मोदींनी दिलेल्या सोशल संन्यासाच्या संकेतांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला. मोदींनी सोशल मीडियाचा त्याग केल्यास त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. मोदींनी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्यास ही मंडळी अनाथ होतील. त्यांना अनाथ करणं योग्य नाही. कारण हीच मंडळी त्यांचे सायबर योद्धे आहेत. योद्धे सेनापतींच्या आदेशावरुन काम करतात. पण सेनापतींनीच सोशल मीडियाचं मैदान सोडलं तर मग फौज काय करणार, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहांनादेखील टोला लगावला. जेव्हा आमचे सायबर योद्धे मैदानात उतरतात, तेव्हा भाजपा निवडणूक जिंकते, असं एकदा शहांनी म्हटलं होतं. त्यामुळे हे सायबर योद्धे काय काम करतात, ते सगळ्यांना माहिती आहे, असंदेखील राऊत म्हणाले. सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे. दंगली भडकवण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी, अपप्रचार करण्यासाठी सोशल मीडिया वापरला जात आहे. त्यामुळेच तर या संदर्भात कायदा करावा लागला, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधलं. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाला सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी रात्री अचानक जाहीर केला. सोशल मीडियाच्या वापराच्या बाबतीत मोदींची तत्परता व चपखलता हा नेहमीच चर्चेचा व कौतुकाचा विषय आहे. असे असूनही जनतेशी संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमांतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार त्यांनी का केला, हे समजू शकलेलं नाही. रात्री ८.५२ वाजता हा धक्का देताना मोदी यांनी लिहिले की, टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन.
मोदींनी सोशल मीडिया सोडू नये, अन्यथा...; संजय राऊत यांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 11:08 AM
सोशल मीडियापासून दूर जाण्याचा इरादा मोदींकडून व्यक्त
ठळक मुद्देपंतप्रधान मोदींकडून सोशल मीडियापासून दूर जाण्याचा इरादा व्यक्तमोदींच्या ट्वीटवर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खोचक टोलामोदींनी सोशल मीडियाचा त्याग केल्यास त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील- राऊत