नवी दिल्ली: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह केलेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यकारभार सुरू केला असला, तरी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे तीव्र झाले आहेत. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भाजप-शिवसेना युतीसंदर्भात केलेल्या विधानांमुळे वेगळीच राजकीय चर्चा रंगू लागली आहे. मात्र, २०२४ मध्ये होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्याची खात्री नसल्यामुळे रावसाहेब दानवे भ्रमिष्टासारखे बोलत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे.
भाजप-शिवसेना दरम्यान २०१९ मध्ये झालेल्या युतीच्या बैठकीदरम्यान ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री ठरले होते, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. संजय राऊतांनी हा दावा खोडून काढला. २०१९ च्या बैठकीदरम्यान ५०-५० टक्के म्हणजेच अडीच वर्ष शिवसेना-अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री असे ठरले होते. मात्र रावसाहेब दानवे हे सध्या जालन्याचे खासदार आहेत. २०२४ मध्ये निवडून येतील की नाही, याची खात्री नाही. त्यामुळे ते असे भ्रमिष्टासारखं बोलत आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी पलटवार केला.
रावसाहेब दानवे कुठेतरी पाताळात फिरतायत
केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी युतीच्या फॉर्म्युल्यावर केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्यावेळी ते निर्णय प्रक्रियेतच नव्हते. माझ्याकडे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची क्लिप आहे, तीच त्यांना पाठवतो. असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. हॉटेल ब्लू सी परळीच्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले निवेदन ऐकले असेल, तर रावसाहेब दानवे कुठेतरी पाताळात फिरतायत, पृथ्वीवर यायचे आहेत, असेच दिसेल, असा टोला लगावत दानवे माझ्या बाजूलाच राहतात, त्यांना ती क्लिप पाठवतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, फुटीर गट चंद्रावरही कार्यालय स्थापन करेल, एवढे हवेत आहेत. शिवसेना भवन, सामना मातोश्रीचा ताबा हवा आहे. अशा प्रकारे एक दिवस ते जो बायडनचं घरही ताब्यात घेतील. १० डाऊनिंग स्ट्रीटला जातील. तिथेही ताबा घेतील. एवढा मोठा पक्ष आहे त्यांचा, या शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटावर पलटवार केला.