मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास नक्की पंतप्रधान होईन, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली होती. राहुल गांधी यांच्या विरोधातील मोदींनी केलेल्या वक्तव्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
या देशात प्रत्येक व्यक्ती पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतो. जर मोदी स्वत:ला प्रधान सेवक म्हणत असतील तर कोणताही सेवक देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास पंतप्रधान होणार का, असा प्रश्न कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देत राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान पदाबद्दल भाष्य केलं. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मोदींनी सडकून टीका केली होती. कर्नाटकामध्ये कोणीतरी मी पंतप्रधान होणार म्हणून महत्वाची घोषणा केली. स्वत:लाच अशा प्रकारे पंतप्रधान म्हणून घोषित करणे हा अहंकाराचा पुरावा नाही का ? असा सवाल पंतप्रधान मोदींनी एका प्रचारसभेत विचारला होता.