नवी दिल्ली : मी शिवसेनेच्या काही खासदारांशी चर्चा केली. त्यांनाही वाटते महाराष्ट्रात भाजपासोबत सरकार व्हावे. तीन आणि दोन वर्षे असा फॉर्म्युला असावा असे मला वाटते. लवकरच या दिशेने चर्चा होऊ शकते अशी माहिती केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गेल्या २५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या धुराळ्यात केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी नवाच फॉर्म्युला देऊन या चर्चेत रंगत आणली आहे. मुख्यमंत्रीपदावरून उत्पन्न झालेला तिढा सोडविण्यासाठी ३ वर्षांसाठी भाजपाला मुख्यमंत्रीपद द्यावे व उर्वरित दोन वर्षे शिवसेनेने हे पद घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.
आठवले म्हणाले, या फॉर्म्युल्यावर लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्याशी बोलणे झाले आहे. तीन-दोनचा फॉर्म्युला भाजपाला मान्य आहे काय? हे आधी स्पष्ट झाले पाहिजे, असे खासदार राऊत यांनी विचारले आहे. सेनेच्या ब-याच खासदारांशीही मी या मुद्यावर बोललो. या फॉर्म्युल्याला भाजपाची मान्यता असेल तर आमचा पक्ष यासाठी सहमत होईल, असे मत खासदारांनी व्यक्त केले. खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासह पाच-सहा खासदारांशी या मुद्यावर चर्चा झाल्याचा दावा आठवले यांनी केला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याशीही या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे आठवले यांनी सांगितले. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर होणा-या निर्णयाला प्रदेश भाजपा बांधिल असल्याचे पाटील यांचे मत असल्याचे आठवले यांनी सांगितले.
तिढा लवकर सुटेल- शाहमहाराष्ट्रातील तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी सर्वपक्षीय बैठकीच्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आठवले यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील तिढा लवकर सोडवावा, अशी विनंती शाह यांना केली. चिंता करू नका, सर्व काही ठिक होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केल्याचे आठवले यांनी सांगितले.