नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनाच्या ढिसाळ व्यवस्थेत सुधारणा करा अन्यथा सोमवारी शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा दम देत शिवसेना खासदार व पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी सदनात ठिय्या दिला. खासदार संतप्त झाल्याने राज्य सरकारचे दिल्लीचे निवासी आयुक्त बिपीन मलीक यांनी आजारी असल्याचे कारण सांगून येण्याचेच टाळले, मात्र दिल्लीत बैठकीसाठी आलेले मुख्य सचिव ज. स. सहारिया यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचल्यावर सहारिया यांच्या विनंतीनंतर, आंदोलन सोमवारपर्यंत पुढे ढकलले. अर्थात त्या अगोदर निवासी आयुक्तांच्या कार्यालयातील घड्याळ फोडले, भिंतीवर निषेधाच्या घोषणा लिहिल्या. घोषणांची पत्रकेही लावली.अचानक झालेल्या या आंदोलनाने सदनात पळापळ उडाली. दुपारी दोन तास या साऱ्यांनी सदनातील व्यवस्था कशी बेताल झाली त्याची पाहणी केली. स्वयंपाक घर, सदनाच्या खोल्या, परप्रांतीय खासदारांनी मिळणाऱ्या सुविधा असे अनेक विषय तपासल्यावर मुख्य सचिव सहारिया यांच्याशी चर्चा केली. दुपारी बारा वाजता शिवसेना नेते खा. संजय राऊत व सचिव खा. अनिल देसाई यांच्या नेतृत्वात खासदारांचा जत्था सदनात दाखल झाला.ते निवेदन घेऊन निवासी आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले, तेव्हा ते विमानतळावर सहारिया यांना आणण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना या आंदोलनाची माहिती दिली गेली. तेव्हा त्यांनी आजारी असल्याचे सांगून सदनात येण्याचे टाळले. सहारिया सदनात आल्यावर त्यांच्यापुढे,सदनातील नळांतून दुषित पाणी येते, आंघोळ केल्यावर पाण्याचा दर्प कायम असतो, उपहारगृहात जेवणाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. महाराष्ट्रीय पध्दतीचे जेवण सांगूनही दिले जात नाही. कोणतीही आॅर्डर केल्यावर तासभर वेळ लागतो,पाण्याच्या बाटल्या पुन्हा वापरल्या जातात अशा अनेक तक्रारी झाल्यावर उत्तरप्रदेशातील बागपतचे भाजपा खासदार व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपालसिंह यांना मंत्र्याचा दर्जा देऊन सदनात केलेली व्यवस्था हा मुद्दा चर्चेला आला. महाराष्ट्रातील खासदारांना साध्या खोल्या व सत्यपाल यांची शाही व्यवस्था का, असा प्रश्न सहारिया यांनी विचारला गेला, त्यांनी यावर कोणतेच भाष्य केले नाही. मात्र सदनाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी असून, योग्य दखल घेऊ, सोमवारपर्यंत सुधारणा झालेल्या दिसतील असे सहारिया यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्र सदनाच्या दुरवस्थेवर शिवसेना खासदारांचा हल्लाबोल
By admin | Published: July 18, 2014 2:37 AM