शीलेश शर्मा नवी दिल्ली : भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तून शिवसेना बाहेर पडली, तरच त्या पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा विचार करू, या सोनिया गांधी यांच्या अटीमुळेच अरविंद सावंत यांनी सोमवारी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला, अशी चर्चा इथे सुरू आहे.महाराष्ट्रातील शिवसेना व भाजप यांची युती आधीच मोडीत निघाली होती; पण केंद्रातील एनडीएमध्ये शिवसेनेचा सहभाग होता आणि अरविंद सावंत मोदी सरकारमध्ये अवजड उद्योगमंत्री होते. त्यांचा राजीनामा हा शिवसेनेचे एनडीएशी संबंध तुटल्याचेच द्योतक आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची अलीकडेच भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यावर चर्चा झाली. त्यावेळीच सोनिया गांधी यांनी शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे, त्यानंतर पाठिंब्यावर विचार करता येईल, असे पवार यांना सांगितले होते. पवार यांनी ही बाब शिवसेना नेते संजय राऊत यांना सांगितली. त्यानंतरच अरविंद सावंत यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास शिवसेनेने सांगितले. अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतरही काँग्रेसने लगेचच आपली भूमिका स्पष्ट केली नाही.>सोनिया गांधींना दिली माहितीकाँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेचे नेते सकाळीच दिल्लीत दाखल झाले. अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर व अनिल देसाई यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. आता आम्ही राज्यात युतीतून आणि दिल्लीत एनडीएतून पूर्णपणे बाहेर पडलो आहोत. त्यामुळे काँग्रेसने आता आम्हाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी विंनती सेना नेत्यांनी अहमद पटेल यांना केली. त्यानंतर अहमद पटेल यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊ न त्यांना या चर्चेची माहिती दिली.
सोनिया गांधींच्या अटीमुळेच ‘एनडीए’तून शिवसेना बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 6:21 AM