Shiv Sena In Delhi High Court: निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान; शिवसेनेच्या याचिकेवर उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 12:44 PM2022-10-10T12:44:13+5:302022-10-10T12:45:16+5:30
Shiv Sena In Delhi High Court: निवडणूक आयोगाच्या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने याचिकेत केली आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दिल्लीउच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर उद्याच सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे.
आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही
निवडणूक आयोगाने बाजू मांडण्याची संधीच आम्हाला दिली नाही. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने रिट याचिकेत केली आहे. तसेच या याचिकेवर तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानंतर आता शिंदे गट, निवडणूक आयोग आणि शिवसेना यांचा सामना दिल्ली उच्च न्यायालयात रंगणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने घाईघाईत सगळे निर्णय घेतले. या सगळ्या गोष्टी आम्ही याचिकेत मांडल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करेल, असे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी म्हटले आहे. धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेने त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"