नवी दिल्ली : धनुष्यबाण कुणाचा याबाबत निवडणूक आयोगाच्या आधी आता सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदविणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश यापूर्वीच्या सुनावणीवेळी न्यायालयाने दिले होते.
शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा याबाबत दोन्ही गटांनी विविध याचिका दाखल केलेल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. न्यायालयात याचा फैसला होण्यापूर्वीच निवडणूक आयोग चिन्हाचा निकाल लावेल, अशी भीती असल्याने उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. त्यानुसार, मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाच्या आधी सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदविणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा दिलासा मानण्यात येत आहे. या बाबात निर्णय नेमका निवडणूक आयोग घेणार की सर्वोच्च न्यायालय, यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकही चिंतेत होते.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे १९ रोजी चिन्हाबाबत निरीक्षण नोंदविणार आहेत. ते २६ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वीच दोन्ही गटांच्या याचिकांचा निकाल लागणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल, असे उद्धव ठाकरे यांनी वारंवार बोलून दाखविलेले आहे.