महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी अचानक यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतल्यानं राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मनसेचं 'इंजिन' जोडलं जाणार का, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, ही भेट शिवसेनेनं फारशी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही.
'दिल्ली हे राजकीय घडामोडींचं केंद्रच आहे. इथे भेटीगाठी होतच असतात. कोण कुणाला कशासाठी भेटतं याची डायरी घेऊन आम्ही बसत नाही. ज्याच्या-त्याच्या पक्षाशी संबंधित हा विषय आहे', अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी ही दोन उत्तुंग व्यक्तिमत्व होती. या भेटीची तुलना त्यांच्या भेटीशी होऊच शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
आषाढी एकादशीला एकत्र पूजा
शिवसेना-भाजपामध्ये आता कुठलीही कुरघोडी नाही, सगळं खुसखुशीत आणि चमचमीत आहे, असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेनं वर्धापन दिन मेळाव्यात आमंत्रित करू नवी प्रथा सुरू केली. त्यानंतर आता आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही विठ्ठलाच्या महापूजेला उपस्थित राहणार असल्याचं समजतं. या पंढरपूर वारीबद्दल विचारलं असता, काही लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला जाऊन भेटण्यात कुणाला हरकत नसावी, असा कोपरखळी त्यांनी मारली. विठ्ठल ही आमची माऊली आहे. आराध्य दैवत आहे. पंढरपूरला शेतकऱ्यांचा महामेळावा घेतला होता, तेव्हा लोकसभेनंतर विठ्ठल दर्शनाला येण्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता आषाढीच्या निमित्ताने ही वारी होणार असेल तर वारकरी आणि महाराष्ट्रातील भाविक नक्कीच स्वागत करतील, असी पुस्ती त्यांनी जोडली.
खळबळ उडवणारी भेट
लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांना महाआघाडीत घ्यावे, असा आग्रह अन्य पक्षांनी धरलेला असताना काँग्रेसचा प्रदेश नेतृत्वाने त्याला विरोध केला होता. परंतु, आता राज आणि सोनिया गांधींच्या भेटीने हे नेते उघडे पडले आहेत. भाजपा-शिवसेनेत जागा वाटपावरून बंडाळीची चिन्हं दिसत असताना राज यांच्या नव्या खेळीने अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत.