गुवाहाटी: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच आता एकनाथ शिंदे नवीन गटाची स्थापना करणार असून, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असे नाव देणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शिवसेनेकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे. यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदे गटात दाखल झालेल्या दीपक केसरकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी मीडियाच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी स्पष्टपणे उत्तरे दिली. यावेळी संजय राऊत यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत फायर बोलतात, त्यामुळे फक्त आग लागते
संजय राऊत यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. परंतु, संजय राऊत आमचे विधिमंडळातील नेते नाहीत. आम्ही त्यांच्यावर का बोलू, असा प्रतिप्रश्न करत, संजय राऊत फायर बोलतात, त्यामुळे फक्त आग लागते, असा टोला लगावला आहे. तसेच आमच्याकडे दोन तृतियांश बहुमत आहे. ५५ आमदारांचा नेता १६ जण कसा बदलणार? असा सवालही दीपक केसरकर यांनी केला आहे.
विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेतील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना, विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार आहोत. आम्ही सगळे शिवसैनिकच आहोत. आम्ही शिवसेना सोडली असं भासवलं जातेय. आम्ही शिवसेनेतच आहोत. लोकांना रस्त्यावर उतरण्याची भाषा चुकीची आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे नेला जाईल याची खात्री देतो, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाही
आमचा पाठिंबा कोणत्याही परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाही. आम्हीच शिवसेना आहोत. विधिमंडळात दोन तृतियांश बहुमत सिद्ध करू. शिवसेनेला कुणीही हायजॅक केलेले नाही आम्ही शिवसेनेच्या विचाराचे, बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना हायजॅक करायचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचे अस्तित्व टिकावे म्हणून हा निर्णय घेतला आहे. आम्ही कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही, तशी गरजच नाही, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.