गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत. यातच सर्वोच्च न्यायालयाने १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. यानंतर बंडखोर आमदारांचे प्रवक्ते असलेले दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.
आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबतच आहोत, जो काही निर्णय ते घेतील, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही लवकरच महाराष्ट्रात येणार आहोत. मुंबईत कधी यायचे, याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. अजूनही आम्ही शिवसेनेतच आहोत. आमच्याकडे मेजोरिटी आहे, आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा पुनरुच्चार दीपक केसरकर यांनी केला.
एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आणि यापुढेही तेच राहतील
एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आणि यापुढेही तेच राहतील. शिवसेनेकडून जी भूमिका घेतेय, त्यात त्यांचेच नुकसान जास्त आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असे आम्ही म्हटलेले नाही. त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ उद्धव ठाकरे यांनी सोडावी, असे आवाहन करत, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. एक लिगसी या पक्षाची आहे. मातोश्रीवर कुणीही आरोप करू नयेत, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी हट्ट केला नसता, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हट्ट केला नसता, तर एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री असते, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीतील सल्लागार अधिक महत्त्वाचे आणि जवळचे वाटतात. जनमताच्या कौलाप्रमाणे शिवसेना-भाजपचे सरकार यायला हवे. शिवसेनेत अवघे १० ते १२ आमदार उरलेत. भाजपने जनमताच्या कौलाचा आदर केला, ते काही रस्त्यावर उतरले नाहीत. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अजूनही आदरच आहे. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून युतीचे सरकार स्थापन करण्याची विनंती केली आहे. अन्यथा आमचा लढा सुरूच राहील, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला आहे. तसेच भाजपसोबत जायचे की नाही, ते एकनाथ शिंदे ठरवतील, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.