गुवाहाटी: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर तीव्र शब्दांत टीका केली. यानंतर आता, सरकारचा रडीचा डाव सुरू झाला आहे. पायाखालची वाळू सरकल्याने सुरक्षा काढून घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना, आम्ही अजूनही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेतच आहोत. कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. चुकीच्या माहितींवर विश्वास ठेऊ नका. आम्ही गट करतोय, ही माहिती वस्तुस्थितीला धरून नाही. योग्य माहिती तुम्हाला दिली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
सगळे आमदार स्वेच्छेने आणि मर्जीने आलेले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी सायंकाळी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १० आमदारांनी फोनवरून सांगितले की, आम्हाला तुमच्यासोबत यायचंय, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर बोलताना, इथे असलेले आमदार स्वेच्छेने आणि आपल्या मर्जीने आलेले आहे. महाविकास आघाडीतील सरकामध्ये आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांनी हा निर्णय स्वतःहून घेतलेला आहे. शेवटी प्रत्येक आमदार २ ते ४ लाख लोकांमधून निवडून येत असतात. ते याबाबत अनभिज्ञ नसतात. त्यांना यातील काही कळत नाही, असे होत नाही. ते सूज्ञ आहेत, त्यांना लाखो लोकांनी निवडून दिलेले आहे. या निर्णयाबाबत त्यांनी स्वतः जाहीरपणे सांगितलेले आहे. एवढेच नव्हे, तर प्रतिज्ञापत्र दिले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडत आहेत, असे एकनाथ शिंदे स्पष्टपणे सांगितले.
हा तर रडीचा डाव, पायाखालची वाळू सरकल्याने कारवाई सुरु
मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य ठिकाणी असलेल्या या आमदारांच्या कार्यालयावर तोडफोड सुरू करण्यात आली आहे. यावर बोलातना, या मालमत्तेचे तसेच जीविताचे रक्षण करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडली पाहिजे, असे शिंदे यांनी ठणकावले. तसेच आमदारांच्या कुटुंबाची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारकडून काढली जात असल्याचे सांगितले जात आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना, हा रडीचा डाव सुरू झाला आहे. पायाखालची वाळू सरकल्याने ही अशा प्रकारची कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.