नवी दिल्ली : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी, प्रचारासह व्यूहरचनेसाठी बाह्या सरकवल्या आहेत. सत्तारुढ भाजपा, शिवसेना, काँग्रेस यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 21 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेकडून यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. तसेच, उमेदवारांची दुसरी यादी 25 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाची सत्ता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर मागच्या पंधरा वर्षापासून भाजपाचे सरकार आहे. या तिन्ही राज्यात भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधातील लाटेचा सामना करावा लागणार आहे.