रविवार २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन पार पडणार आहे. परंतु यापूर्वीच यावरून वाद सुरू आहे. काही पक्षांनी संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. आता यावरून शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं निशाणा साधलाय.‘निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याचे नाव असते तर लोकशाहीची शोभा वाढली असती, पण आमच्या खासगी पंगतीत कोणी यायचे नाही, आलात तर अपमान करू, असा स्पष्ट संदेश सरकारने दिलाय,’ असं म्हणत निशाणा साधला.
‘संसदेच्या सर्वाधिकारी, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच आमंत्रण नाही तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? मिंधे-फडणवीस यांना अशा पंगतीत बसायला आवडते. त्यांनी जायलाच हवे. फक्त आडवाणी यांना एखादा कोपरा आहे काय तेवढे पाहा,’ असं म्हणत ठाकरे गटानं सामनाच्या संपादकीयमधून टीकेचा बाण सोडला.
काय म्हटलंय संपादकीयमध्ये?
भारतीय जनता पक्ष लोकांना भ्रमित करण्यात पटाईत आहे. लोकांना पेडगावचा रस्ता दाखवायचा व वेडगावला न्यायचे असे त्याचे धोरण आहे. दिल्लीत रविवारी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असून २० विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकला आहे. बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान मोदी यांनी फीत कापण्याचे ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न असं संपादकीयमध्ये म्हटलंय.
‘हा अहंकार घातक’
संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्य़ावर २० राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला यावर भाजपचे लोक टीका करीत आहेत, पण सत्य असे आहे की, २० प्रमुख पक्षांचा विरोध नव्या संसद भवनाच्या उद्घाटनास नाही. उद्घाटनाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना नाही हा वादाचा मुद्दा आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते होणे हे परंपरेला धरून झाले असते, पण ‘‘हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच!’’ असे मोदींचे धोरण आहे. हा अहंकार लोकशाहीला घातक असल्याचं म्हणत ठाकरे गटानं निशाणा साधलाय.
‘अडवाणींना निमंत्रण दिलं का?’
‘महाराष्ट्रातील भाजप भजनी मंडळातील टाळकुटय़ांनाही यानिमित्ताने कंठ फुटला आहे. शिवसेनेने उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकला, पण उद्धव ठाकरे यांना बोलवतेच कोण? असे सवाल देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विचारले. ही त्यांची टाळकुटी संस्कृती आहे. ज्या आडवाणींमुळे भाजपला आजचे ‘अच्छे दिन’ पाहायला मिळाले, त्यांना तरी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले काय? की त्यांनाही गेटवरच अडवले जाणार आहे ते आधी सांगा. संसदेच्या सर्वाधिकारी, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच आमंत्रण नाही तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? मिंधे-फडणवीस यांना अशा पंगतीत बसायला आवडते. त्यांनी जायलाच हवे. फक्त आडवाणी यांना एखादा कोपरा आहे काय तेवढे पाहा,’ असं म्हणत त्यांनी टीका केली.