गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी केंद्रानं ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, यावरून आता शिवसेनेने जोरदार निशाणा साधला आहे. हिंदुस्थानचे विद्यार्थी युक्रेनमधील सुमी, किव, खारकिव येथे आक्रोश करीत होते तेव्हा आपले पंतप्रधान वाराणसीच्या प्रचार सभेत गंगाकिनारी डमरू वाजवत होते. हेच जर कोणाला ‘ऑपरेशन गंगा’ वाटले असेल तर तुम्हाला कोपरापासून साष्टांग दंडवत. आम्हीही तुमच्या झिंदाबादचे नारे द्यायला तयार आहोत, पण राजकारण काही काळ गंगार्पण करा, असं म्हणत शिवसेनेने यावर टीका केली आहे.
‘ऑपरेशन गंगा’चा खुळखुळा थांबवा आणि सुमीमध्ये, रशियात अडकलेल्या हजारो हिंदुस्थानी मुलांना सुखरूप घेऊन या. सुटका (evacuation) यालाच म्हणतात. युक्रेनमधून परतलेल्या मुलांचे तेच म्हणणे आहे. ‘ऑपरेशन गंगा’ त्यालाच म्हणता येईल. गंगेला आणखी किती बदनाम कराल?, असा खरमरीत सवालही शिवसेनेने केला आहे.
काय म्हटलेय अग्रलेखात?युक्रेनमधून हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी झोपी गेलेले मोदी सरकार जागे झाले, पण युक्रेनमधून हाल-अपेष्टा सहन करून जे विद्यार्थी मायदेशी पोहोचले, त्यांनी ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेची पोलखोल केल्याने मोदी सरकारची झोप उडाली आहे. युक्रेनमध्ये वीस हजारांच्या आसपास विद्यार्थी अडकून पडले ते मोदी सरकारच्या ‘ढिम्म’ प्रवृत्तीमुळेच. युद्धाचे ढग जमा होत आहेत व मोदींचे दोस्त पुतीनभाई ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत याचे आकलन व्हायला आपल्या परराष्ट्र मंत्रालयास इतका उशीर का व्हावा?
"सरकारचा सहभाग कुठे?"याच काळात अमेरिका व युरोपियन राष्ट्रांनी त्यांचे नागरिक आणि विद्यार्थी यांना युद्धाची पहिली गोळी उडण्याआधीच बाहेर काढले व आमचे विदेश मंत्रालय तेव्हा हिंदुस्थानी विद्यार्थ्यांसाठी ‘ऍडव्हायजरी’ म्हणजे मार्गदर्शक सूचना जाहीर करीत होते, ताबडतोब युक्रेन सोडा. खारकिव किंवा किव प्रांतातून मिळेल त्या रस्त्याने बाहेर पडा. यात सरकारचा सहभाग कुठे दिसतो?
"राजकीय प्रचाराचे खेळणे ठरले"हाल-अपेष्टांचे चित्रण निवडणूकग्रस्त उत्तर प्रदेशात पोहोचले तेव्हा ‘ऑपरेशन गंगा’चा उदय झाला. मग ते चार मंत्री पाठवले, विमाने गेली, बेजार आणि भुकेल्या विद्यार्थ्यांसमोर भाषणे दिली. मुलांना विमानात चढवल्यावर त्यांच्याकडून ‘‘मोदी झिंदाबाद’’चे नारे लगावून घेण्यात आले, पण या ‘झिंदाबाद’मधील क्षीणपणाही समोर आला. शेवटी ‘ऑपरेशन गंगा’ हे एक राजकीय प्रचाराचे खेळणेच ठरले. यदेशी परतलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्यांनी जे भोगले आणि सोसले त्याच्या थरारक कहाण्या सांगितल्या आहेत. देशात भाजपचे थोतांडी ‘आयटी’ सेलचे ‘गोबेल्स’ मुलांना कसे गुमराह करीत आहेत, तेसुद्धा समोर आले.
"ही शोकांतिकाच म्हणावी लागेल"युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू आहे, पण झळा आणि कळा जगाला बसत आहेत. पुतीन वॉररूममध्ये आहेत. युक्रेनचे झेलेन्स्की प्रत्यक्ष युद्धभूमीवर आहेत तर हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी हे उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात अडकले आहेत, ही त्या अडकून पडलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची शोकांतिकाच म्हणावी लागेल.