दिल्लीच्या निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले, आता प. बंगालातही तेच घडले; शिवसेनेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 07:30 AM2021-05-07T07:30:02+5:302021-05-07T07:31:36+5:30
पश्चिम बंगालमधी हिंसाचाराचं मूळ भाजप नेत्यांच्या निवडणुकीतील चिथावणीखोर वक्तव्यात : शिवसेना
आज जो हिंसाचार उसळला असल्याचे छाती पिटून सांगितले जाते त्याचे मूळ भाजप नेत्यांच्या निवडणुकीतील चिथावणीखोर वक्तव्यात आहे. बंगालातील भाजप नेत्यांनी प्रचारात ताळतंत्र सोडला होता. हिंसेचे खुले समर्थन हे लोक करीत होते. हिंसा करा, खूनखराबा करा, पण निवडणुका जिंका असे त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना जणू आदेशच होते. असं म्हणत शिवसेनेने पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.
भाजपचे बंगालचे प्रांताध्यक्ष दिलीप घोष हे प्रचार सभांतून जाहीरपणे काय बोलत होते? ते सांगत होते, ‘‘आम्हीच जिंकणार; आम्ही जिंकल्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना रस्त्यांवर कुत्र्यांप्रमाणे गोळय़ा मारू!’’ संसदेचे सदस्य असलेल्या व भाजपचे राज्यातील नेतृत्व करणाऱया दिलीप घोष यांची ही चिथावणी आहे. हेच दिलीप घोष एके ठिकाणी जाहीरपणे सांगतात की, ‘‘डायरीत लिहून ठेवा, तृणमूल कार्यकर्त्यांना आम्ही सोडणार नाही,’’ असे म्हणत शिवसेनेने निशाणा साधला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीका केली.
काय म्हटलंय अग्रलेखात?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगवी वस्त्रं परिधान करतात ते एक तपस्वी किंवा संन्यस्त वगैरे आहेत हे बाजूला ठेवा, पण एका राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. हे मुख्यमंत्री दुसऱया राज्यात जाऊन धमक्या देतात. बंगालात जाऊन योगी महाराज धमकावतात की, ‘२ मे नंतर तृणमूलचे कार्यकर्ते आमच्याकडे जीवाची भीक मागतील.’ या धमकीचा अर्थ काय समजायचा? म्हणजे भाजपचा विजय झालाच असता तर तृणमूल कार्यकर्त्यांचे रक्ताचे पाट वाहिले असते व जीवाची भीक मागणाऱ्या तृणमूल कार्यकर्त्यांकडे पाहून या मंडळींना आसुरी आनंद मिळाला असता.
राजकारणाचे हे रक्ताळलेले रूप आहे. ही लोकशाही वगैरे नसून ठोकशाही आहे. प. बंगालातील हिंसाचाराचे समर्थन कोणीच करणार नाही. निवडणुका संपल्यावर वैर संपायला हवे, पण ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या क्षणापर्यंत राज्यात निवडणूक आयोगाचे, म्हणजे केंद्राचेच राज्य होते व कायदा-सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलाच्या हातात होती. ममता बॅनर्जी यांना काहीच हालचाल करता येऊ नये म्हणून राज्याच्या पोलीस महासंचालकांपासून अनेक अधिकाऱयांना निवडणूक आयोगाने हटवले. मग राज्यातील हिंसाचाराची जबाबदारी नक्की कोणाची?
तृणमूल काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. भाजपवाले रंगवतात तितके हिंसाचाराचे चित्र भेसूर नाही. जेथे भाजपचे लोक निवडून आले आहेत त्याच भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, असे तृणमूलचे म्हणणे आहे. हे खरे असेल तर ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जात आहे काय? २०१९ मध्ये बंगालात भाजपचे १८ खासदार निवडून आले. त्यानंतर जे उन्मादी राजकारण सुरू झाले त्यातून अनेक ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले गेले.
प. बंगालची ही परंपरा आहे असे म्हणायचे तर मग रवींद्र संगीत, रवींद्रनाथ टागोर, बंगालची साहित्य-संस्कृती, सामाजिक सुधारणांचा प्रवाह, स्वातंत्र्य लढय़ातील क्रांतीची मशाल हे सर्व वाया गेले काय? प. बंगालचा खरा संस्कार हाच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले. आता प. बंगालातही तेच घडले. देशात कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी पडत आहेत. दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता?