शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. तसेच खिळे सीमेवर ठोकले असते, तर चीननं घुसखोरी केली नसती, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला होता. तुम्ही अन्नदात्याला दहशतवादी म्हणता. पण तुमची वर्तणूक दहशतवाद्यांपेक्षा वरची आहे, असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली.शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिल्ली उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गाझीपूर येथे भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. आमचं शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनीशी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत. सरकारनं त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हा कोणत्याही राज्याचा विषय नाही. हा देशातील शेतकऱ्यांचा विषय आहे. चर्चेत कोणतंही राजकारण येऊ देऊ नये," असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली राकेश टिकैत यांची भेट; संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 2:05 PM