नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, गोवा या ठिकाणी शिवसेनेचा दारुण पराभव झाला. नोटापेक्षा शिवसेनेला कमी मते पडली. यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक करताना त्यांना टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना, महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला याचा आनंद आहे, असे सांगत गोव्यात निवडणुका जिंकल्याचा कोणीही टेंभा मिरवू नये. गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात राहत नाही. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस गोव्याच्या विजयाचे शिल्पकार असल्याने भाजपा कार्यालयात त्यांचे मोठे स्वागत झाले, ढोल वाजवले, लेझीम खेळले. विधानभवनातही त्यांचे मोठे स्वागत झाले. महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला याचा आनंद झाला, पण गोवा कोणाला जिंकता येत नाही. गोव्याचे राजकारण फार विचित्र आहे. तिथे कधीही पक्ष जिंकत नाही, तर व्यक्ती जिंकते. त्यातील काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
शरद पवार यांना बदनाम केले जातेय
पणजीत उत्पल पर्रीकरांचा पराभव झाल्यानंतर भाजप उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी आपल्या विजयात पक्षाचा सहभाग नसल्याचे सांगितले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा राज्यातील नेत्यांच्या विरोधात सुडबुद्धीने वागत आहेत. त्यांना राज्यातील टार्गेट दिले असून हल्ले करण्यास सांगण्यात आलं आहे. या देशात असे कधी घडले नव्हते. शरद पवार टार्गेट असून बदनाम केले जात आहे. दाऊदचा कसला संबंध लावत आहेत? काल पक्षात आलेले लोक हे शरद पवारांसंबंधी ज्या भाषेत बोलत आहेत हे फडणवीस, मोदींना, गडकरींना मान्य आहे का? मान्य नसेल तर महाराष्ट्राचे पुढारी म्हणून त्यांनी खंडन, निषेध केला पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, राज्याचे, देशाचे आणि लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी दोन्ही बाजूंनी काम होणे लोकशाहीत महत्वाचे असते. पण दुर्दैवाने गेल्या सात, आठ वर्षात हे चित्र पहायला मिळत नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे जन्माचे शत्रू आहेत, पराकोटीचे वैर आहे, महाभारत आहे कौरव-पांडवांचे अशाप्रकारे एकमेकांसमोर उभे ठाकले असतात. हे चित्र देशाच्या संसदीय लोकशाहीसाठी चांगले नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.