पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती, राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी दिलेला शाप अशा अनेक कारणांवरुन यावेळी संसदेचं हिवाळी अधिवेशन गाजलं. जया बच्चन यांच्या वक्तव्याची अद्यापही चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र परखड शब्दांत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत व राजकीय विरोधकांना ते रोज अपमानित करीत आहेत. देशात ‘Free and Fair’ असे काही उरलेच नाही. जया बच्चन यांनी राज्यसभेत संतापाने उभे राहून सरकार पक्षाला शाप दिला, त्याची चर्चा अजून सुरूच आहे असं ते म्हणाले.
"ऐतिहासिक इमारतही थरथरली असेल""लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संपूर्ण कफन ओढून सरकारी पक्षाने संसदेचे अधिवेशन संपवले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या 12 राज्यसभा खासदारांचे निलंबन शेवटपर्यंत रद्द केले नाही. हे बारा खासदार शेवटपर्यंत संसद भवनासमोरील गांधी पुतळ्यापाशी बसून राहिले. लोकशाहीत विरोधकांच्या वर्तनावर नेहमी बोट दाखविले जाते, पण सत्ताधाऱ्यांचे वर्तन हे कितीही बेकायदेशीर असले तरी त्यांच्याकडे कोणी बोट दाखवीत नाही. राज्यसभेत जया बच्चन संतापाने थरथरत उभ्या राहिल्या व म्हणाल्या, ‘मी तुम्हाला शाप देत आहे. तुमचे बुरे दिन लवकरच सुरू होत आहेत. तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे चूक आहे. आमचा गळाच एकदाचा घोटून टाका. लोकशाही संपूर्ण खतम करा,’ असे बच्चन म्हणाल्या. तेव्हा संसदेची ती ऐतिहासिक इमारतही क्षणभर थरथरली असेल," असं संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात म्हटलं आहे.
ते चित्र विदारकविरोधी पक्षाचा इतका अवमान यापूर्वी कधीच झाला नसेल. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात अडकले. संसदेला वाऱ्यावर सोडले आणि लोकशाही संसद भवनासमोरील गांधी पुतळ्यापाशी उघडय़ावर पडली असे चित्र दिसले. ते विदारक होते.
विरोधकांना कुत्र्यासारखी वागणूकजुन्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत एक वाक्य कोरलेली पाटी होती. त्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत. ‘‘जो जो मी निर्वाचित जनप्रतिनिधींचे चाळे पाहतो तो तो मला माझ्या कुत्र्यांची जास्तच प्रशंसा करावीशी वाटते- – लामरटीन
यावर बाळासाहेब ठाकरे चिरुटाचा धूर सोडत म्हणत, ‘तुम्ही कुत्र्यांचा यात अपमान करीत आहात! माणसांपेक्षा ते एकनिष्ठ असतात!’ आज दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे वावरत आहेत. ते विरोधकांना कुत्र्यांसारखे वागवीत आहेत. पण दिल्लीचा इतिहास असे सांगतो, “Every dog has his days.” हे जगभरातील राजकारणात अनुभवण्यास येते. त्यावर भाजपचेच एक कोंडमारा झालेले मंत्री हळूच म्हणाले, “dog चे काय घेऊन बसलात. dog हा शब्द उलटा करून पहा, Every god has also his day!” तेच खरे आहे.