अयोध्या: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीचा सूर उमटण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीत जिंकतील. मात्र, काँग्रेसचा एक उमेदवार जिंकू शकेल. दुसऱ्या उमेदवाराचे गणित काँग्रेसने त्यांच्या पद्धतीने जुळवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अयोध्येत संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांना विधान परिषदेच्या निवडणुकीविषयी प्रश्न विचारण्यात आले. शिवसेना आपले दोन उमेदवार निवडून आणेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांना निवडून येण्यासाठी एक-दोन मते कमी पडत आहेत, पण ते निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार नक्की निवडून येईल. पण एकासाठी संघर्ष करावा लागेल. आता दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचे गणित कसे जुळवायचे हे तेच ठरवतील, असे संजय राऊत म्हणाले.
आमच्याकडे मतेच नाहीत
दहाव्या जागेवरील काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपक्षांना साद घालणार का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी आणि सरकारचे नेते आहेत. दहाव्या जागेवरील काँग्रेसचा उमेदवार कसा निवडून आणायचा याबाबत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे राऊत यांनी सांगितले. संजय राऊतांच्या वक्तव्याचा सूर पाहता काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना विशेष कष्ट घेणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार नाही का, या प्रश्नावर, आमच्याकडे मतेच नाहीत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीतही भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच दहाव्या जागेवर उभा असलेला काँग्रेसचा उमेदवार पडणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने भाई जगताप यांना निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसचीच आहे, असे सांगत हात झटकले होते.