Sanjay Raut On Nana Patole: मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुका लांबणीवर पडत आहेत. यातच मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचनेवरून नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. याला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर देत, मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता, हे नाना पटोले यांना आठवतंय का, असा थेट सवाल केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर होता, त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असा टोला लगावला होता. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता हे नाना पटोले यांना आठवते आहे का? त्यांनी काँग्रेसचा अभ्यास केला पाहिजे. अजूनही काही गोष्टी त्यांच्या अभ्यासातून सुटले आहेत. काँग्रेसच्या वाढीबद्दल आम्हालाही आस्था आहे. एकेकाळी काँग्रेसचे मुंबईवर राज्य होते पण तेव्हा मुंबई काँग्रेसला नेतृत्व होते. पण मुंबईचा राजा शिवसेनाच आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मुंबई कधी तुंबली याची माहिती हवी असेल तर शिवसेनेच्या संदर्भ विभागातून मी पाठवतो, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
आम्ही अजून शोधतोय ती आहे कुठे?
किरीट सोमय्या आमच्या सहकार्यांवर कुटुंबावर तोंड फाटेपर्यंत बोलतात. माझ्या मुलींच्या नावाने वायनरी फॅक्टरी आहे असा आरोप केला, आम्ही अजून शोधतोय ती आहे कुठे? मुंबईत पोहोचल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या फ्रॉडचे, भ्रष्टाचाराचे एक मोठे प्रकरण उघड करणार आहे. किरीट सोमय्यांची भविष्यात जी प्रकरणे पुढे येतील ती पाहिल्यानंतर लोकं रस्त्यावर त्यांना फटकावल्या शिवाय राहणार नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी नाना पटोलेंवर हल्लाबोल केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, दरवर्षी पावसात मुंबई पाण्याखाली येते. अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर राहिला आहे. त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असे पटोलेंनी म्हटले आहे. तसेच नाना पटोलेंनी सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाली असल्याचा आरोप केला आहे. आम्ही कोर्टात या बाबत न्याय मागण्याची भूमिका घेणार आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.