मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी पुस्तक मागे घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल रात्री उशिरा दिली. मात्र यावरुन शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. 'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना असल्याची टीका शिवसेनेनं 'सामना'मधून केली आहे. ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन शिवसेनेनं महाराष्ट्र भाजपावर थेट निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. आता भाजपवाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. यावर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. 11 कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची वावटळ उठली आहे, त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. ही वावटळ पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात नाही हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांच्या पाठीमागे हे सर्व उद्योग सुरू आहेत. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात झाले. महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेला हे अजिबात आवडले नाही. श्री. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय? याचे उत्तर एका सुरात 'नाही…नाही!' असेच आहे. त्यांची तुलना जे शिवाजी महाराजांशी करतात त्यांना छत्रपती शिवाजीराजे समजलेच नाहीत, असं सामनानं अग्रलेखात म्हटलं आहे.
'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 7:37 AM